गोवा मुक्तीसंग्राम दिन 19 डिसेंबर
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
- इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी राजवटीतून भारतीयांची सुटका झाली.
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरपासून ते हैदराबाद पर्यंतची अनेक संस्थानंसुद्धा भारतात सामील झाली;
- पण गोवा, दीव, दमण हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरदेखील पोर्तुगीजांच्या अमलाखालीच होते.
- गोवा आणि महाराष्ट्रातील आंदोलकांच्या अथक चळवळींमुळे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवामुक्तीचे स्वप्न सत्यात उतरले.
- गोव्याच्या पोर्तुगीजांपासूनच्या मुक्तीसाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्याग्रहींना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
450 वर्षांपूर्वी पोर्तुगालचा अल्फान्सो आल्बुकर्क याने गोव्यात प्रवेश केला. त्यावेळी त्या ठिकाणी आदिलशहाची हुकूमत होती. तब्बल 6000 मुसलमानांची हत्या करत अल्फान्सो आल्बुकर्कने गोव्यावर कब्जा केला होता. पोर्तुगीजांना गोव्यात त्यांचे राज्य, धर्म आणि व्यापारउदीम वाढवायचा होता. धर्मांतराची जबरदस्ती, जुलमी अत्याचाराच्या मार्गे पोर्तुगीजांनी गोव्यात आपले बस्तान बसवले होते.
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय जनतेची इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्ती झाली.
- पण गोव्याची जनता मात्र हालअपेष्टांचे जगणे जगत होती.
- पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून चळवळ सुरू केली.
- दरम्यान देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा 18 जून 1946 रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगाव येथे जाहीर सभेत गोव्यातील जनतेला पोर्तुगीज शासनाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केलं होतं.
- डॉ. राममनोहर लोहिया यांच्या आवाहनाला गोवेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- पोर्तुगीजांची सत्ता तसेच सालाझारच्या हुकूमशाहीला टक्कर देण्यासाठी गोमंतकीय मातीतील नवीन पिढी सज्ज झाली.
यामध्ये प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणार्या आंदोलकांसह गावातील अनेक तरुण पुढे आले. त्यांनी आझाद गोमंतक दल सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पुढील काळात पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी.बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस आदींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. डॉ. टी. बी. कुन्हा हे गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक होते. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना 8 वर्षांची शिक्षा झाली होती. पोर्तुगालच्या तुरुंगात त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. 1953 मध्ये त्यांची सुटका झाली. गोव्याच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
गोव्याच्या सीमा ताब्यात घेऊन भारतीय सैन्याने तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांची कोंडी केली होती. दरम्यान पत्रादेवी या ठिकाणी पोर्तुगीज सैन्याने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांवर गोळीबार केला. यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक धारातीर्थी पडले. अखेर 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा याने शरणागती पत्करली. त्याने शरणागती दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना सोपवले. अशाप्रकारे पोर्तुगीजांच्या जवळपास 450 वर्षांच्या गुलामगिरीतून गोव्यातील जनता मुक्त झाली.